Saturday, May 11, 2013

शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा मागोवा [२०१३]

                            

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! महाराजांचे जीवन हे अनेक रोमांचक गोष्टीनी भरलेले आहे! त्यापैकीच एक म्हणजे "महाराजांची आग्रा येथील औरंगजेबाशी भेट व तेथून त्याच्या कैदेतून सुटका ". आज २०१३ साली सुद्धा आपण अश्या महान राजाच्या या पराक्रमा बद्दल संशोधन करत आहोत, खरेच खूप खूप कुतूहलाचा असा हा विषय आहे. म्हणूनच आपण "पुरंदरच्या तहपासून ते महाराजांच्या राजगडावर परत येण्याच्या" या घटनांचा मागोवा घेत आहोत!
                                   

मिर्झा राजांचे प्रकरण 

(जन्म १५ जुलै १६११ - मृत्यू २८ ऑगस्ट १६६७)
मिर्झा राजे जयसिंग हे राजस्थानातील राजपूत राजे. अतिशय पराक्रमी. वडिलांचे नाव "महा सिंग" तसेच आईचे नाव "दमयंती". लहानपणा पासूनच मिर्झा राजे जयसिंग हे मुघलांच्या सैन्यात निष्ठेने रुजू होते. औरंगजेबला शिवाजी महाराजांविरुद्ध यश काही मिळत नव्हते म्हणूनच त्यांनी आपल्या या पराक्रमी सरदाराला शिवरायांचा बिमोड करावयास पाठवले, तसेच सोबत दिलेरखानाला पण पाठवले! म्हणूनच मिर्झा राजे शिवाजी महाराजंचा बिमोड कसा करावा याबाबतीत  जवळपास अनेक दिवस त्यांचा आमेर च्या किल्ल्यात खलबते करत होते ! ( मला माझ्या राजस्थान भटकंती सुमारास हा किल्ला पहावयास मिळाला !) . मिर्झा राजांनी तेथे काचेच्या विविध प्रकारांना एकत्र करून एक शीश महाल म्हणजेच काचेचा महाल बांधला होता. मला हा महाल पहायची संधी मिळाली, येथेच मिर्झा राजांनी शिवरायांचा पाडाव कसा करावा या बाबतीत एक महिना खलबत केले होते! औरंगजेब हा शिवाजी महाराजंचा बिमोड करण्या साठी इतका उत्सुक होता की ज्या सुमारास मिर्झा राजे जयसिंग हे महाराष्ट्रावरच्या मोहिमेस जात होते तेव्हा त्याने स्वतःच आपल्या गळ्यातील मोत्यांचा हार मिर्झा राजांना दिला होता! कोणत्याही बादशाहने असे कधीच केले नव्हते! या वरूनच आपले शिवराय हे किती उच्च प्रतीचे सेनानी होते याचे दर्शन होते !
                                         
पुरंदरचा तह 

मिर्झा राजांनी आपल्या युद्ध कौशल्याने शिवरायांची घौडदौड काही क्षणापुरती का होईना पण थांबवली. परंतु यात महाराजांचे कमीपणा नाही उलट दूर दृष्टी आहे. कारण चाणक्याने त्याच्या "चानाक्यानिती" या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे " जर दीर्घकालीन नफा होणार असेल तर अल्पकालीन नुकसान हे राजाला सोसायला हवे" यानुसारच शिवरायांनी तह केला होता. तसेच तहात २३ किल्ले देण्याच्या गोष्टी केल्या होत्या पण वास्तविक जोडकिल्ले मिळून १९ किल्लेच मुघलांच्या ताब्यात दिले गेले , यावरून महाहाराजांचे कौशल्य दिसून येते, मिर्झा राजे व महाराज यांच्या दरम्यान पुरंदर च्या तहात जे काही करारनामा झाला होता त्याची २२ फुट लांब कागदपत्रे आजपण उपलब्ध आहेत, राजस्थानातील "बिकानेर" येथील  पुरातन संग्रालयात, विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कागदपत्रे तब्बल २२ फुट एवढी लांब आहेत व ती गुंडाळी करून ठेवण्यात व उघडण्यात येते ! ( या कागद पत्रांची तसेच पुढील काही स्थळांची छायाचित्रे माझी नाही, ती  ए बी पी माझा च्या एका कार्यक्रमात मला आढळली तीच येथे मी दिली आहेत )

                                    


महाराज आग्रा भेटीस का गेले?
मिर्झा राजांना महाराजांविरुद्ध यश मिळाले पण त्यांना भीती वाटायला लागली की जर का महाराज हे आदिलशहा व कुतुबशाहा यांना जाऊन मिळाले तर आपले दक्खन जिंकणे जवळपास अशक्य आहे , या भावनेने मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना आग्रा भेटीच्या कल्पनेबद्दल सांगितले व त्यांना राजी केले. पण महाराज औरंगजेब सारख्या स्वतःच्या वडिलांना  कैदेत टाकणाऱ्या  तसेच सक्ख्या भावांना पण ठार करणाऱ्या क्रूर माणसाच्या भेटीस आग्र्यात गेलेच कशाला ? या बद्दल अनेक इतिहासकारांमध्ये अनेक मत आहेत, त्या बद्दल काही तर्क

१)काहींच्या मते महाराजांना बादशाही दरबाराचे निरीक्षण करायचे होते.
२)काहींच्या मते शिवाजी महाराजांना जंजिर्याचा "सिद्धी" हवा होता. तो औरंगजेबाच्या चाकरीत असल्याने आग्रा भेटीमुळे जंजिरा प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता होती. म्हणजेच औरंगजेब हा "सिद्दी" वर दबाव निर्माण करेल व जंजिरा स्वराज्यात दाखल होईल.
३) काहींच्या मते महाराज हे कधीही नर्मदा नदीच्या पुढच्या प्रदेशात गेलेले नव्हते, कशी आहे तेथील परिस्थिती तसेच कसे आहे तेथील राजकारण ते समजण्यासाठी महाराज आग्रा भेटीस तयार झाले.

अश्या प्रकारे ५ मार्च १६६५ ला महाराज आग्र्याला जाण्यासाठी निघाले. त्यांच्या बरोबर त्यांचे अतिशय विश्वासू साथीदार त्याच प्रमाणे त्यांच्या गुप्तहेर खात्यातील अनेक माणसे होती.
                   


महाराष्ट्र ते आग्रा 


राजगडावरून निघताना जिजाबाई यांच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवून संभाजी राजांना सोबत घेऊन महाराज क्रूरकर्मा औरंजेबाच्या भेटीस आग्र्याला निघाले. सर्वप्रथम ते औरंगाबादेस आले जे दक्खन चे ठाणे होते. या शहरात महाराष्ट्राच्या या पराक्रमी राजाला पाहण्या साठी तुडुंब गर्दी उसळली होती. वास्तविक औरंगजेबाने महाराजांचा "शहजादा" प्रमाणे इंतजाम करावा अशी तंबी दिली हती. त्यांचा प्रवासखर्च देखील दक्खन च्या तिजोरीतून मंजूर केला होता. औरंगाबादेस आल्यावर बादशहाचा सरदार "साफ्शिखन खान " नावाचा सरदार हा उद्धटपणे महाराजांच्या भेटीस गेला नाही , परंतु महाराजांनी देखील त्याला काडीचीही किमत न देत मिर्झा राजे यांच्या तेथील हवेलीत वास्तव्यास निघून गेले परंतु वरिष्ठांकडून आपली चांगलीच कान उडानी होणार या भीतीने तो महाराजांच्या भेटीस गेला , तेव्हा मिर्झा राजांच्या हवेली मागे असलेल्या शंकराच्या मंदिरात राजे गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यानंतर हा खान  भेटीस गेला. विशेष म्हणजे आजदेखील २०१३ मध्ये हा भाग जयसिंगपूर म्हणूनच ओळखला जातो. परंतु आता येथे या भागात इमारती आहेत. आग्रा प्रवासात महाराज बहुतेक वेळा सराईत (धर्मशाळा) थांबल्याचे आढळून येते.

शेरशहा सूर याने दक्खन ते दिल्ली हा प्रवास करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी दर ५ किलोमीटर अंतरावर विश्रांतीसाठी सराई बांधल्या होत्या.आज या सार्यांवर अतिक्रमणे झालेले आढळतात. आग्रास महाराजांच्या स्वागतासाठी वरिष्ठ सरदार ऐवजी मिर्झा राजे यांचा पुत्र रामसिंग यांचा मुन्शी ला पाठवले.या मुन्शीने महाराजांविषयी अतिशय सुंदर पत्र लिहिले आहे त्यात महाराजांचे कौतुक सुद्धा केले आहे. महाराज व औरंगजेब हे लाल किल्ल्यात दिवान-ए-आम मध्ये भेटणार होते परंतु चुका-मुकी मुळे ते दिवान-ए-खास मध्ये भेटले. व पुढील इतिहास हा आपल्या सर्वाना ठाऊकच आहे!

                



कैद - सुटका


दरबारातील प्रसंगानंतर महाराज कुठे गेले ? याबाबतीत राजस्थानी पत्रांमध्ये उल्लेख आहे अकबर बादशाह ने निर्माण केलेल्या "फिरोज खान" च्या कबरीच्या परिसारत रामसिंग चे डेरे होते याच परिसरात शिवाजी महाराजांनी मुक्काम केला होता व पुढे काही दिवसांनी पोलाद्खानाच्या ( व अप्रत्यक्षरीत्या औरंगजेबाच्या ) कैदेत राहिले! राजस्थानी पत्राच्या अनुसार शिवाजी महाराज ज्या प्रदेशात वास्तव्यास होते तेथे तिहेरी पहारा होता त्याचप्रमाणे या परिसरात एक पाण्याचे तळे देखील होते ( आता नाही आहे). महाराजांनी नंतर आपल्या सर्व सहकार्यांना महाराष्ट्रात परत पाठवण्यची विनंती औरंगजेबाला केली तसेच त्यांच्या साठी परवाने देखील काढले. याच सुमारास महाराजांनी आपल्या स्वतःचे खोट्या नावाचे परवाने देखील मोठ्या शिताफीने काढले.यानंतर योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी  मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. त्या नंतर  हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांच्या हाताचे कडे दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता, व मदारी मेहतर हा त्यांचे पाय चेपीत होता. शिवराय दूर गेल्याचे अंदाज येताच हे दोघे पण निसटले, तब्बल १८ तासानंतर बादशाला सिंह पिंजयातून सुटला आहे याचे भान झाले पण तोवर उशीर झाला होता.

                 


परतीचा रस्ता 


आग्रा भेटीचा 
हा अतिशय विवादास्पद भाग आहे . कारण महाराज कोणत्या रस्त्याने परत आले महाराष्ट्रात याबद्दल दुमत आहे.
१) महाराज आल्या रस्त्याने परत गेले असतील महाराष्ट्रात. 
२) परंतु याची शक्यता अतिशय कमी आहे कारण हा सर्व प्रदेश मुघलांच्या ताब्यात आहे. त्यामुळे महाराज क्वचितच या प्रदेशातून गेले असतील. 
३) नरवर च्या घाटातून उतरताना मुघल सैनिकांनी महाराजांना पकडलेले परंतु महाराजांनी ( मगाशी वर उल्लेख केल्याप्रमाणे) खोट्या नावाचे परवाने दाखवून शिताफीने सुटका करून घेतली.
४) औरंगजेबाला जेव्हा हे गोष्ट कळली तेव्हा त्याने या सैनिकांची मनसब कमी गेली.
५)चंबळ नदीतून शिवाजी महाराज आपल्या साथीदारांसह गेले असा उल्लेख येथील स्थानिक मच्छीमारांनी केलेला आढळतो.
५) शिवाजी महाराजांनी आपला जो दुसरा रस्ता निवडलेला तो दोन सत्ता ( मुघल व इतर) यांच्या सरहद्दी वरचा होता असे मानण्यात येते
६) महाराज २५ दिवसात विक्रमी वेळेत राजगडावर पोहोचले
७) महाराजांना किंबहुना पुन्हा एकदा दिल्ली वर स्वारी करायची असेल त्यामुळे त्यांही हा रस्ता कोणता आहे ते गुलदस्त्यातच ठेवले असेल 
८) परंतु महाराज सुखरूप पणे राजगडावर पोहोचले यात महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यश आहे हे निश्चितच.

काही तर्क 

शिवाजी महाराज जेव्हा लहानपणी शहाजी राजांशी भेटावयास बंगलोर ला गेलेले तेव्हा पुण्यात परत जाताना शहाजी राजांनी शिवाजी महाराजांकडे काही विश्वासू माणसे पाठवली त्यात काही शिक्षक देखील पाठवले त्यांमध्ये " शत्रूने अचानक आक्रमण केले व आपण कैद झालो तर त्याच्या प्रदेशातून कसे निसटून जावे" ही विद्या शिकवणारे काही तज्ञ देखील शहाजी राजांनी शिवाजी महाराजांसोबत पुण्याला पाठवले होते. किंबहुना या विद्येचा महाराजांना आग्र्याच्या प्रसंगी फायदा झाला ?

नाण्याच्या २ बाजू
 

शिवाजी महाराज औरंगजेबाला धूळ चारून महाराष्ट्रात परत आले. नंतर काही वर्षातच महाराजांनी अजेय बढत मिळवत पुरंदर च्या तहात गेलेले सगळे किल्ले परत मिळवले. याच्या उलट दक्खन च्या पराभवाने मिर्झा राजे हे परत गाशा गुंडाळून दिल्ली ला परत निघण्याची तयारी करू लागेले. शेवटी औरंजेबानेच "विषप्रयोगाने" त्यांना ठार केले.

अश्या प्रकारे मला सापडलेला महाराजांच्या आग्रा भेटी संदर्भातला माहितीचा खजिना मी आपल्यापुढे उघड केला आहे. शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाला माझा त्रिवार मुजरा.
.
.
.
[प्रस्तुत लेख लिहिण्या साठी ABP माझा च्या एका कार्यक्रमाची खूप मदत झाली त्याबद्दल आभार:)]

Sunday, April 28, 2013

आपला अक्साई चीन !

 सध्या वर्तमान पत्रांमध्ये आपण चीन ने भारताची सीमा रेषा ओलांडली याबाबतीत अनेक बातम्या वाचत आहोत!  भारताचा काही भूभाग हा चीन सारखा लबाड देश ५० च्या दशक पासून ताब्यात घेऊन बसला आहे! मनुष्याची विरळ वस्ती असलेला भाग खरेतर खूपच सुंदर आहे ! म्हणूच या सुंदर अश्या प्रदेशाबाबत जाणून घायची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली ! काय आहे तेथील परिस्थिती ? आपल्या भारताचा भाग असेलेल्या त्या प्रदेशा बद्दल खरेच खूप काही जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली ! भारताच्या या भागाचे नाव आहे " अक्साई चीन" . भारताचे चीन बरोबर जे युद्ध झाले होते ते याच भागात आणि याच भाग साठी!
                                             





नकाशात दाखवल्या प्रमाणे तुम्ही हा भाग ओळखला असेल ! . इयत्ता ५ वी पासून आपण भूगोल मध्ये हा भाग जम्मू - काश्मीर या राज्याचा भाग म्हणून पाहतो! परंतु या प्रदेशावर  सध्या चीन चे नियंत्रण आहे.  खरेतर अक्साई चीन हा लडाख जवळील प्रदेश आहे ( हो हो!! ३ इडीय्ट्स मधलेच लडाख) त्यामुळे आपल्याला हा प्रदेश किती सुंदर असेल याची थोडी फार कल्पना तर नक्कीच आली असेलच. सर्वप्रथम या प्रदेशाच्या नावाचा अर्थ सांगतो अक्साई हा भारतीय किवा चीनी शब्द नाही तर तो चक्क तुर्की शब्द आहे! झालात न चकीत ! परंतु अक्साई ची तुर्की मधली फोड "अक" आणि "साई" अशी होते , त्याचा मराठीतील अर्थ अक म्हणजे "सफेद" आणि साई म्हणजे " दरी अथवा घाट" म्हणजेच "सफेद दरी अथवा सफेद घाट". तसेच "चीन" हा शब्द "चीराना" या तुर्की शब्दाचा अपभ्रंश आहे . या चीराना शब्दाचा मराठीत अर्थ होतो " उजाड जागा " . परंतु चीन चे सरकार मात्र भारताच्या या प्रदेशावर आपला अवैध हक्क दाखवण्यासाठी या प्रदेशाचा नावाचा पण गैरवापर करते व या प्रदेशाच्या नावाचा अर्थ " चीन चे उजाड सफेद वाळवंट" असा काढते !
                                                

भौगोलिक दृष्ट्या हा भाग तिबेट च्या पठारी भागात मोडतो ! अक्साई चीन मध्ये एक नदी आहे त्याचे नाव देखील "अक्सेचीन" असे आहे! येथे हिमवर्षाव नाही होत तसेच येथे पाऊस देखील नाही पडत ! अतिशय उंच असलेला हिमालय पर्वतामुळे! या भागात मनुष्याची वस्ती नाही. भारत किवा चीन यापैकी कोणत्याच देशातील लोक येथे राहत नाही. हा भाग निर्मनुष्य आहे. परंतु येथे सतत अस्तित्व असते लष्कराचे.या प्रदेशात बहुदा प्रवासासाठी सायकल चा वापर सुद्धा करण्यात येतो ! येथूनच चीन भारताची एल. ओ. सी. भंग करतो. नुकताच चीन ची काही हेलिकॉपटर अक्साई चीन भागातून भारतीय हद्दीत घुसली तसेच तेथून जेवणाचे पाकिटे तसेच काही पत्रकांचे पाकिटे भारताच्या हद्दीत टाकून निघून गेले. नंतर काही दिवसांनी बातमी आली ( जी आपण सध्या वाचत आहोत) कि चीनी सैन्य भारताच्या हद्दीत १० किमी भागात घुसले आहे ते देखील या प्रदेशाची सीमा मोडून ! व आता येथून मागे जायलाच तयार नाही. दोन्ही सैन्यामध्ये वरिष्ठ लोकांची या विषयी चर्चा झाली परंतु काहीही तोडगा निघाला नाही ! चीन शेवटपर्यंत असेच म्हणत होता कि त्यांही सीमा ओलांडली नाही ! 


अक्साई चीन हा भारताचाच भाग आहे यात शंका नाही. फाळणी होण्यापूर्वी ब्रिटीश अधिकार्यांनी नकाशाचे मापन करताना हा प्रदेश भारताच्या ताब्यात दिलेला आहे. परंतु आफ्रिदी लोकांनी १९४८ मध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये काश्मीरचा  काही भूभाग हा त्यांचा ताब्यात गेला आहे जो आज आपण पाक व्याप्त काश्मीर या नावाने ओळखतो.व उरलेल्या काही भागावर म्हणजेच अक्साई चीन वर सध्या चीन चे नियंत्रण आहे! विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन चा "खास" मित्र असलेल्या पाकिस्तानला अक्साई चीन हा प्रदेश चीन च्या ताब्यात असणे याबाबतीत फारशी उत्सुकता नाही , ते असेच पकडून चालतात की काश्मीर मध्ये हा प्रदेश नाही आहे तो चीन चा ( तिबेट) चा प्रदेश आहे!  (अर्थात याच्या मोबदल्यात त्यांना चीन कडून प्रचंड प्रमाणात मदत मिळते !)  



                            

अक्साई चीन हा भारताचा प्रदेश जरी निर्मनुष्य असला तरीपण सुंदर आहे, येथील वातावरण तसेच अनेक भौगोलिक गोष्टी खरेच खूप छान आहे! परंतु आपले दुर्दैव की आपल्या स्वतःच्या देशाचा हा भाग असूनही आपल्याला येथे जाता येत नाही ! मला देखील एकदा येथे जायला नक्की आवडेल ! परंतु सध्या तरी लष्करी परिस्थिती मुळे ते शक्य होणार नाही ! पण तरी सुद्धा मी माझी हौस YouTube द्वारे पूर्ण केली आहे. अक्साई चीन हा भारताचा भाग असलेला प्रदेश कसा आहे यावर अनेक YouTube video उपलब्ध आहे!  सध्या तरी दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंध शांततेच्या मार्गाने कसे सुधारतील हे पाहणेच आपल्या हातात आहे! :)
   
                                                   

Friday, October 12, 2012

अविस्मरणीय रीवर राफ्टींग



                             

आयुष्यात अनेक धाडसी गोष्टी केल्या आहेत तसेच करायच्या देखील आहेत ! परंतु राहून राहून एक गोष्ट मनात सलत होती कि आपण कधीच "रीवर राफ्टींग" केलेली नाही ! गेल्या वर्षी माझ्या महाविद्यालयातील मित्रांसोबत हिमाचल प्रदेश ला मनमुराद "भटकंती" करायचा योग जुळून आला व तसेच मी माझ्या राहिलेल्या या स्वप्नाकडे  अपेक्षेने पाहत होतो ! वास्तविक रीवर राफ्टींग हा प्रकार खरेच धोकादायक आहे किवा नाही या बद्दल दुमत आहे ! कारण कितीही काहीही झाले तरी सुद्धा आपण पाण्याशी स्पर्धा करू शकत नाही ! म्हणूनच मला काही प्रमाणात भीती असली तरी सुद्धा या अनुभवासाठी उत्सुकता पण तितकीच होती ! मुंबईहून निघाल्या पासूनच मनाशी याबाबतीत निश्चय हा पक्का केला होता आणि मग आम्ही ( सिरहंद- पंजाब) येथून माझ्या मित्राच्या ओळखीने एस यु वी बुक केली आणि निघालो "हिमाचल च्या सफारी" ला !  वास्तविक रस्त्यात आम्हाला हिमाचल सरकारच्या अनेक प्रकल्पांनी साथ दिली आणि पुढे जाता जाता आम्हाला वाटेत चहू बाजूनीहिम नदीने वेधले ! माझ्या कॅमेर्यामध्ये मी याची चित्रण करून यु ट्यूब वर टाकलेले आहे, येथूनच शीख धर्माचा पवित्र गुरुद्वारा "मानीकरण" देखील लागतो. त्या बाबतीत सुद्धा मी पुढे लिहीनच. येथून पुढे गेल्या वर आपल्याला रस्त्याच्या डावीकडे रीवर राफ्टींग साठी अनेक कॅम्प दिसून आले .



माझ्या मित्राच्या चाणाक्ष नजरेतून आम्ही एका कॅम्प वर गेलो, तसेच तेथे रीवर राफ्टींग बद्दल प्राथमिक माहिती घेतली, त्याच्या सांगण्यानुसार एक होता २० मिनिटांचा आणि १ होता ४५ मिनिटांचा , आम्ही त्याला त्याचे योग्य मानधन देऊन ४५ मिनिटांचा प्रवास आरक्षित केला. आता मनात प्रचंड मानसिक खळबळ सुरु होती , आपल्याला काही होणार तर नाही ना ? पाणी प्रचंड थंड असणार आहे , पाण्यातील एखाद्या खडकावर जर आपटलो तर काय होईल? इत्यादी इत्यादी वाईट विचारांनी माझ्या मनाला घेरले. परंतु मग मनाशी पक्के करून आता मी हे करणारच असा निर्धार केला आणि कपडे बदलले. आम्हाला त्या लोकांकडून सांगण्यात  आले कि कमीत कमी कपडे घाला. त्यानुसार आम्ही कपडे बदलले.
                                                                   

 
                                      

आता आम्हाला तेथून एका मारुती गाडीत बसवून कुल्लू पासून १०-१२ किलोमीटर उंचावर घेऊन गेले , येथून काही अंतरावरच मानली होती म्हणजे आम्ही जवळ जवळ कुल्लू शहराच्या हद्दी वर होतो. आता येथून उतरल्या उतरल्या आमच्या कडून काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली ( म्हणजे काही बरे वाईट झाल्यास आम्ही जवाबदार नाही!) येथून पुढे २० मिनिटे आम्हाला एकांतात ठेवण्यात आले आम्ही नदीकिनारी येऊन पोहोचलो होतो. मी सहजच कुतूहलाने नदीच्या पत्रात पाय टाकला तर पाणी किती ( प्रचंड) थंड आहे याची क्षणिक जाणीव मला या ठिकाणी झाली ! बाकीचे लोक हे आमच्या रीवर राफ्टींग साठी परिपूर्ण अशी बोट तयार करत होते. तसेच त्याची सुरक्षा चाचणी घेत होते. मी विचार केला माझे काही या क्षणाची कायम आठवण म्हणून सर्व मित्रान सोबतचा क्षण कॅमेर्यात कैद करावा तसा मी केला ( "हा" तो विडीओ )


                                        

                                       

आम्हाला आता आमच्या सहकार्यांकडून बोट कशी हाकावी या बद्दल प्रशिक्षण देण्यात आले. अर्थात आमच्या वजन नुसार आम्हाला बोट मध्ये बसायचे होते, जर वजन असंतुलित झाले तर आम्ही नक्की पाण्यात पडून वाहत जाणार होतो  आमची सुरक्षा चाचणी झाली आणि आम्ही देवाचे नाव घेऊन बोटीत चढलो माझ्या वजनानुसार मला मागच्या बाजूला बसायला सांगितले होते! तत्पूर्वी मी माझा कॅमेरा चालकाला देऊन मोकळा झालेलो. आता आमचं बोटीला धक्का मारण्यात आला आणि आम्ही नदीच्या मुख्य प्रवाहात आलो होतो ! प्रवाहाच्या सोबत असलो तरी सुद्धा वल्हवायला प्रचंड उर्जा लागत होती असे करत करत आम्हाला नदीच्या प्रवाहाचा आधार मिळाला , लाटांशी गटांगळ्या खात खात आम्ही आता पुढे पुढे चालत होतो . पाण्यात ३-४ ठिकाणी भवरे  दिसले त्यांना टाळून आम्हाला खडकांपासून सावध राहून पुढे सरकायचे होते, आता मात्र वेग खूप झाला होता बोट नियंत्रणातून सुटायची पाळी होती तर तेव्हाच आम्ही वजनाच्या संतुलानाने ( आम्हाला हे शिकवलेले) आम्ही बोट नियंत्रणात आणली. आता वल्हवायला फारसा त्रास होत नव्हता परंतु नदीचं या पाण्याचा दबावामुळे थोडा त्रास होत होता पाणी नाका तोंडात जात होते , पाण्याला इतका जोर होता कि आमचे सगळे कपडे भिजले आम्ही पूर्ण जोश मधे ओरडत / किंचाळत होतो कारण खरेच "रीवर राफ्टींग" चा तो अनुभव अविस्मरणीय ठरणार होता!! पाण्याचं दबावाचा मारा सहन करत करत आम्ही  अश्या प्रकारे अर्ध्या तासात आमच्या बेस कॅम्प वर आलो !
 



                

चालकाच्या हातात कॅमेरा असल्याने त्या क्षणाचे छायाचित्रणा झाले आणि आम्ही विजयी मुद्रेने बाहेर पडलो एकमेकांना मिठ्या मारल्या.. खरेच एक साहसी काम करून आल्याबद्दल मनात प्रचंड समाधान होते आणि ते चेहऱ्यावर दिसत देखील होते ! बाहेर पडल्या पडल्या ओले झालेले अंग पुसले नवीन कपडे घातले बाजूलाच गरम गरम भुट्टा होता त्याच्या वर ताव मारला , चहा प्यायलो व सर्वाना धन्यवाद करून या अविस्मरणीय क्षणाची सांगता केली ! आता आम्हाला आमचे पुढचे डेस्टीनेशन "मनाली" खुणावत होते!  तेथील अजून एका साहसी खेळाकडे माझे लक्ष गेले "Paragliding" !!!!