Saturday, May 11, 2013

शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा मागोवा [२०१३]

                            

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! महाराजांचे जीवन हे अनेक रोमांचक गोष्टीनी भरलेले आहे! त्यापैकीच एक म्हणजे "महाराजांची आग्रा येथील औरंगजेबाशी भेट व तेथून त्याच्या कैदेतून सुटका ". आज २०१३ साली सुद्धा आपण अश्या महान राजाच्या या पराक्रमा बद्दल संशोधन करत आहोत, खरेच खूप खूप कुतूहलाचा असा हा विषय आहे. म्हणूनच आपण "पुरंदरच्या तहपासून ते महाराजांच्या राजगडावर परत येण्याच्या" या घटनांचा मागोवा घेत आहोत!
                                   

मिर्झा राजांचे प्रकरण 

(जन्म १५ जुलै १६११ - मृत्यू २८ ऑगस्ट १६६७)
मिर्झा राजे जयसिंग हे राजस्थानातील राजपूत राजे. अतिशय पराक्रमी. वडिलांचे नाव "महा सिंग" तसेच आईचे नाव "दमयंती". लहानपणा पासूनच मिर्झा राजे जयसिंग हे मुघलांच्या सैन्यात निष्ठेने रुजू होते. औरंगजेबला शिवाजी महाराजांविरुद्ध यश काही मिळत नव्हते म्हणूनच त्यांनी आपल्या या पराक्रमी सरदाराला शिवरायांचा बिमोड करावयास पाठवले, तसेच सोबत दिलेरखानाला पण पाठवले! म्हणूनच मिर्झा राजे शिवाजी महाराजंचा बिमोड कसा करावा याबाबतीत  जवळपास अनेक दिवस त्यांचा आमेर च्या किल्ल्यात खलबते करत होते ! ( मला माझ्या राजस्थान भटकंती सुमारास हा किल्ला पहावयास मिळाला !) . मिर्झा राजांनी तेथे काचेच्या विविध प्रकारांना एकत्र करून एक शीश महाल म्हणजेच काचेचा महाल बांधला होता. मला हा महाल पहायची संधी मिळाली, येथेच मिर्झा राजांनी शिवरायांचा पाडाव कसा करावा या बाबतीत एक महिना खलबत केले होते! औरंगजेब हा शिवाजी महाराजंचा बिमोड करण्या साठी इतका उत्सुक होता की ज्या सुमारास मिर्झा राजे जयसिंग हे महाराष्ट्रावरच्या मोहिमेस जात होते तेव्हा त्याने स्वतःच आपल्या गळ्यातील मोत्यांचा हार मिर्झा राजांना दिला होता! कोणत्याही बादशाहने असे कधीच केले नव्हते! या वरूनच आपले शिवराय हे किती उच्च प्रतीचे सेनानी होते याचे दर्शन होते !
                                         
पुरंदरचा तह 

मिर्झा राजांनी आपल्या युद्ध कौशल्याने शिवरायांची घौडदौड काही क्षणापुरती का होईना पण थांबवली. परंतु यात महाराजांचे कमीपणा नाही उलट दूर दृष्टी आहे. कारण चाणक्याने त्याच्या "चानाक्यानिती" या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे " जर दीर्घकालीन नफा होणार असेल तर अल्पकालीन नुकसान हे राजाला सोसायला हवे" यानुसारच शिवरायांनी तह केला होता. तसेच तहात २३ किल्ले देण्याच्या गोष्टी केल्या होत्या पण वास्तविक जोडकिल्ले मिळून १९ किल्लेच मुघलांच्या ताब्यात दिले गेले , यावरून महाहाराजांचे कौशल्य दिसून येते, मिर्झा राजे व महाराज यांच्या दरम्यान पुरंदर च्या तहात जे काही करारनामा झाला होता त्याची २२ फुट लांब कागदपत्रे आजपण उपलब्ध आहेत, राजस्थानातील "बिकानेर" येथील  पुरातन संग्रालयात, विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कागदपत्रे तब्बल २२ फुट एवढी लांब आहेत व ती गुंडाळी करून ठेवण्यात व उघडण्यात येते ! ( या कागद पत्रांची तसेच पुढील काही स्थळांची छायाचित्रे माझी नाही, ती  ए बी पी माझा च्या एका कार्यक्रमात मला आढळली तीच येथे मी दिली आहेत )

                                    


महाराज आग्रा भेटीस का गेले?
मिर्झा राजांना महाराजांविरुद्ध यश मिळाले पण त्यांना भीती वाटायला लागली की जर का महाराज हे आदिलशहा व कुतुबशाहा यांना जाऊन मिळाले तर आपले दक्खन जिंकणे जवळपास अशक्य आहे , या भावनेने मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना आग्रा भेटीच्या कल्पनेबद्दल सांगितले व त्यांना राजी केले. पण महाराज औरंगजेब सारख्या स्वतःच्या वडिलांना  कैदेत टाकणाऱ्या  तसेच सक्ख्या भावांना पण ठार करणाऱ्या क्रूर माणसाच्या भेटीस आग्र्यात गेलेच कशाला ? या बद्दल अनेक इतिहासकारांमध्ये अनेक मत आहेत, त्या बद्दल काही तर्क

१)काहींच्या मते महाराजांना बादशाही दरबाराचे निरीक्षण करायचे होते.
२)काहींच्या मते शिवाजी महाराजांना जंजिर्याचा "सिद्धी" हवा होता. तो औरंगजेबाच्या चाकरीत असल्याने आग्रा भेटीमुळे जंजिरा प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता होती. म्हणजेच औरंगजेब हा "सिद्दी" वर दबाव निर्माण करेल व जंजिरा स्वराज्यात दाखल होईल.
३) काहींच्या मते महाराज हे कधीही नर्मदा नदीच्या पुढच्या प्रदेशात गेलेले नव्हते, कशी आहे तेथील परिस्थिती तसेच कसे आहे तेथील राजकारण ते समजण्यासाठी महाराज आग्रा भेटीस तयार झाले.

अश्या प्रकारे ५ मार्च १६६५ ला महाराज आग्र्याला जाण्यासाठी निघाले. त्यांच्या बरोबर त्यांचे अतिशय विश्वासू साथीदार त्याच प्रमाणे त्यांच्या गुप्तहेर खात्यातील अनेक माणसे होती.
                   


महाराष्ट्र ते आग्रा 


राजगडावरून निघताना जिजाबाई यांच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवून संभाजी राजांना सोबत घेऊन महाराज क्रूरकर्मा औरंजेबाच्या भेटीस आग्र्याला निघाले. सर्वप्रथम ते औरंगाबादेस आले जे दक्खन चे ठाणे होते. या शहरात महाराष्ट्राच्या या पराक्रमी राजाला पाहण्या साठी तुडुंब गर्दी उसळली होती. वास्तविक औरंगजेबाने महाराजांचा "शहजादा" प्रमाणे इंतजाम करावा अशी तंबी दिली हती. त्यांचा प्रवासखर्च देखील दक्खन च्या तिजोरीतून मंजूर केला होता. औरंगाबादेस आल्यावर बादशहाचा सरदार "साफ्शिखन खान " नावाचा सरदार हा उद्धटपणे महाराजांच्या भेटीस गेला नाही , परंतु महाराजांनी देखील त्याला काडीचीही किमत न देत मिर्झा राजे यांच्या तेथील हवेलीत वास्तव्यास निघून गेले परंतु वरिष्ठांकडून आपली चांगलीच कान उडानी होणार या भीतीने तो महाराजांच्या भेटीस गेला , तेव्हा मिर्झा राजांच्या हवेली मागे असलेल्या शंकराच्या मंदिरात राजे गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यानंतर हा खान  भेटीस गेला. विशेष म्हणजे आजदेखील २०१३ मध्ये हा भाग जयसिंगपूर म्हणूनच ओळखला जातो. परंतु आता येथे या भागात इमारती आहेत. आग्रा प्रवासात महाराज बहुतेक वेळा सराईत (धर्मशाळा) थांबल्याचे आढळून येते.

शेरशहा सूर याने दक्खन ते दिल्ली हा प्रवास करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी दर ५ किलोमीटर अंतरावर विश्रांतीसाठी सराई बांधल्या होत्या.आज या सार्यांवर अतिक्रमणे झालेले आढळतात. आग्रास महाराजांच्या स्वागतासाठी वरिष्ठ सरदार ऐवजी मिर्झा राजे यांचा पुत्र रामसिंग यांचा मुन्शी ला पाठवले.या मुन्शीने महाराजांविषयी अतिशय सुंदर पत्र लिहिले आहे त्यात महाराजांचे कौतुक सुद्धा केले आहे. महाराज व औरंगजेब हे लाल किल्ल्यात दिवान-ए-आम मध्ये भेटणार होते परंतु चुका-मुकी मुळे ते दिवान-ए-खास मध्ये भेटले. व पुढील इतिहास हा आपल्या सर्वाना ठाऊकच आहे!

                



कैद - सुटका


दरबारातील प्रसंगानंतर महाराज कुठे गेले ? याबाबतीत राजस्थानी पत्रांमध्ये उल्लेख आहे अकबर बादशाह ने निर्माण केलेल्या "फिरोज खान" च्या कबरीच्या परिसारत रामसिंग चे डेरे होते याच परिसरात शिवाजी महाराजांनी मुक्काम केला होता व पुढे काही दिवसांनी पोलाद्खानाच्या ( व अप्रत्यक्षरीत्या औरंगजेबाच्या ) कैदेत राहिले! राजस्थानी पत्राच्या अनुसार शिवाजी महाराज ज्या प्रदेशात वास्तव्यास होते तेथे तिहेरी पहारा होता त्याचप्रमाणे या परिसरात एक पाण्याचे तळे देखील होते ( आता नाही आहे). महाराजांनी नंतर आपल्या सर्व सहकार्यांना महाराष्ट्रात परत पाठवण्यची विनंती औरंगजेबाला केली तसेच त्यांच्या साठी परवाने देखील काढले. याच सुमारास महाराजांनी आपल्या स्वतःचे खोट्या नावाचे परवाने देखील मोठ्या शिताफीने काढले.यानंतर योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी  मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. त्या नंतर  हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांच्या हाताचे कडे दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता, व मदारी मेहतर हा त्यांचे पाय चेपीत होता. शिवराय दूर गेल्याचे अंदाज येताच हे दोघे पण निसटले, तब्बल १८ तासानंतर बादशाला सिंह पिंजयातून सुटला आहे याचे भान झाले पण तोवर उशीर झाला होता.

                 


परतीचा रस्ता 


आग्रा भेटीचा 
हा अतिशय विवादास्पद भाग आहे . कारण महाराज कोणत्या रस्त्याने परत आले महाराष्ट्रात याबद्दल दुमत आहे.
१) महाराज आल्या रस्त्याने परत गेले असतील महाराष्ट्रात. 
२) परंतु याची शक्यता अतिशय कमी आहे कारण हा सर्व प्रदेश मुघलांच्या ताब्यात आहे. त्यामुळे महाराज क्वचितच या प्रदेशातून गेले असतील. 
३) नरवर च्या घाटातून उतरताना मुघल सैनिकांनी महाराजांना पकडलेले परंतु महाराजांनी ( मगाशी वर उल्लेख केल्याप्रमाणे) खोट्या नावाचे परवाने दाखवून शिताफीने सुटका करून घेतली.
४) औरंगजेबाला जेव्हा हे गोष्ट कळली तेव्हा त्याने या सैनिकांची मनसब कमी गेली.
५)चंबळ नदीतून शिवाजी महाराज आपल्या साथीदारांसह गेले असा उल्लेख येथील स्थानिक मच्छीमारांनी केलेला आढळतो.
५) शिवाजी महाराजांनी आपला जो दुसरा रस्ता निवडलेला तो दोन सत्ता ( मुघल व इतर) यांच्या सरहद्दी वरचा होता असे मानण्यात येते
६) महाराज २५ दिवसात विक्रमी वेळेत राजगडावर पोहोचले
७) महाराजांना किंबहुना पुन्हा एकदा दिल्ली वर स्वारी करायची असेल त्यामुळे त्यांही हा रस्ता कोणता आहे ते गुलदस्त्यातच ठेवले असेल 
८) परंतु महाराज सुखरूप पणे राजगडावर पोहोचले यात महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यश आहे हे निश्चितच.

काही तर्क 

शिवाजी महाराज जेव्हा लहानपणी शहाजी राजांशी भेटावयास बंगलोर ला गेलेले तेव्हा पुण्यात परत जाताना शहाजी राजांनी शिवाजी महाराजांकडे काही विश्वासू माणसे पाठवली त्यात काही शिक्षक देखील पाठवले त्यांमध्ये " शत्रूने अचानक आक्रमण केले व आपण कैद झालो तर त्याच्या प्रदेशातून कसे निसटून जावे" ही विद्या शिकवणारे काही तज्ञ देखील शहाजी राजांनी शिवाजी महाराजांसोबत पुण्याला पाठवले होते. किंबहुना या विद्येचा महाराजांना आग्र्याच्या प्रसंगी फायदा झाला ?

नाण्याच्या २ बाजू
 

शिवाजी महाराज औरंगजेबाला धूळ चारून महाराष्ट्रात परत आले. नंतर काही वर्षातच महाराजांनी अजेय बढत मिळवत पुरंदर च्या तहात गेलेले सगळे किल्ले परत मिळवले. याच्या उलट दक्खन च्या पराभवाने मिर्झा राजे हे परत गाशा गुंडाळून दिल्ली ला परत निघण्याची तयारी करू लागेले. शेवटी औरंजेबानेच "विषप्रयोगाने" त्यांना ठार केले.

अश्या प्रकारे मला सापडलेला महाराजांच्या आग्रा भेटी संदर्भातला माहितीचा खजिना मी आपल्यापुढे उघड केला आहे. शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाला माझा त्रिवार मुजरा.
.
.
.
[प्रस्तुत लेख लिहिण्या साठी ABP माझा च्या एका कार्यक्रमाची खूप मदत झाली त्याबद्दल आभार:)]

No comments: