Sunday, June 28, 2015

पासपोर्ट टू प्लुटो - २

मागील भाग "पासपोर्ट टू प्लुटो " मध्ये आपण प्लुटो या (बटू) ग्रहाचा शोध कसा लागला , कोणी लावला व त्याच्या छायाचित्रांचा रोमहर्षक प्रवास याबद्दल माहिती घेतली. आता पासपोर्ट टू प्लुटो या लेखमालिकेच्या द्वितीय भागात आपण प्लुटो सोबत होणाऱ्या पहिल्या भेटीची माहिती घेऊ. ( जर आपण मागील भाग " पासपोर्ट टू प्लुटो " वाचला नसेल तर येथे क्लिक करा)

                                           

मागील भागात सांगितल्या प्रमाणे प्लुटो या ग्रहाचे आपल्या कडे आजदेखील एकसुद्धा संपूर्ण छायाचित्र नाही. वास्तविक इंटरनेट वर आपण गुगल केले तर आपल्याला प्लुटो ची अनेक छायाचित्रे आढळतील परंतु ती सर्व खोटी आहेत. मानवाने अजून पर्यंत " प्लुटो हा ग्रह" दिसायला कसा आहे हे जाणून घेतले नाही. कारण प्लुटो हा आकाराने अतिशय छोटा व अतिदूर आहे , म्हणून आज देखील आपण फक्त निरीक्षणांच्या सहाय्याने केवळ अंदाजच लाऊ शकतो कि प्लुटो हा ग्रह दिसायला कसा असेल किवा त्याच्या पृष्ठभाग कसा असेल, किवा त्याचं वातावरण कसे असेल, किवा तो कोणत्या रंगाचा दिसत असेल, या सर्व गोष्टींचा आपण सध्या फक्त अंदाजच लाऊ शकतो

अमेरिका या देशाच्या टपाल खात्याने प्रत्येक ग्रहाच्या मानवाच्या  पहिल्या भेटीचे महत्व लक्ष्यात घेऊन टपाल तिकीट छापले आहे, त्यात त्या ग्रहाचे अस्सल छायाचित्र, त्याचप्रमाणे त्या ग्रहाला कोणी भेट दिली व  सबंध मानव जाती साठी त्या ग्रहाचे पहिले अस्सल छायाचित्र हस्तगत केले याचा उल्लेख आहे. प्लुटो बाबतीत मात्र हे अगदी उलटे आहे. कारण आजपर्यंत प्लुटो वर कोणतेही यान पाठवण्यात आले नाही. पण याचा अर्थ असा नाही कि कधी कोणी प्रयत्नच केला नाही, वॉयेजर -  २ हे यान प्लुटो ला भेट देणार होते ! असे झाले असते तर आपण ७० ते ८० च्या दशकातच प्लुटो चे पहिले वहिले अस्सल छायाचित्र घेतले असते परंतु  अचानक त्याचा मार्ग वळवण्यात आला व त्याने प्लुटो ऐवजी शनि ग्रहाचा उपग्रह " टायटन" ला भेट दिली. खगोल अभ्यासकांच्या मते "टायटन" ने  त्यांना प्लुटो पेक्षा जास्त आकर्षित केले कारण तेथे पृथ्वीशी मिळते जुळते वातावरण आढळले. वॉयेजर -  २ ने सुद्धा आपले काम चोखपणे बजावत टायटन ला भेट दिली, त्याचे छायाचित्र हस्तगत केले व अनेक निरीक्षणे नोंदवून ते यान आपल्या अनंत काळाच्या प्रवासाला निघाले ( आज २०१५ मध्ये देखील वॉयेजर -  २ या यानाचा प्रवास चालू आहे व ते पृथ्वीवर संदेश परत पाठवत आहे ).


या सर्व घडामोडींमुळे २००५ पर्यंत आपण प्लुटो चा माग  काढण्यात अयशस्वी होतो.  प्लुटो चे १ वर्ष हे पृथ्वीच्या २४८ वर्षांच्या बरोरीचे आहे, त्यामुळे जर का प्लुटो वर लवकरच यान पाठवले नाही तर प्लुटो ला भेट देण्या साठी अजून २४८ वर्षे थांबावे लागले असते . म्हणूनच अमेरिका च्या नासा ने  "न्यू होरायझन्स"  या यानाला प्लुटो वर पाठवायचा निर्णय घेतला , २००६ साली सुरु झालेला या यानाचा प्रवास आज देखील चालू आहे. वास्तविक प्लुटो हा ग्रह पृथ्वी पासून प्रचंड लांब आहे त्यामुळे एवढा लांब प्रवास जलद गतीने  करण्या साठी खगोल अभ्यासकांनी प्रचंड मेहनत घेतली, न्यू होरायझन्स आजपर्यंत चे सर्वात प्रगत त्याचप्रमाणे सर्वात जलद प्रवास करणारे यान ठरले आहे, त्याने आपल्या पृथ्वीच्या चंद्राची कक्षा केवळ ९ तासात ओलांडली ( अपोलो या चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमेला चंद्रावर पोचायला ३ दिवस लागले होते ! ) तसेच मंगळ व गुरु यांच्या मधला लघुग्रहांचा पट्टा पार करून न्यू होरायझन्स फक्त १३ महिन्यात गुरु जवळ पोहोचले ( गलिलिओ यानाला गुरु जवळ पोहोचायला ६ वर्ष लागलेली ) म्हणजे आपल्याला कळून येईल कि न्यू होरायझन्स हे किती जलद रित्या प्रवास करत आहे. एवढा जलद प्रवास करून देखील आपल्याला प्लुटो जवळ पोहोचण्यासाठी ९ वर्षाहून अधिक कालावधी लागला !

एवढ्या जलद वेगाने जाऊन देखील न्यू होरायझन्स  १४ जुलै २०१५ ला प्लुटो जवळ पोहोचणार आहे. या यांबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी आपण जाणून घेऊ.

१) न्यू होरायझन्स  इतक्या जलद वेगात प्लुटो जवळ जात आहे , कि एखाद्या छोट्याश्या दगडाच्या तुकड्याच्या टकरीने    देखील संपूर्ण यान नष्ट होऊ शकते !

२) न्यू होरायझन्स  प्लुटो ला जरी भेट देणार असले तरी सुद्धा ते प्लुटो च्या वातावरणात फार कमी वेळ राहणार आहे, कारण न्यू होरायझन्स  या यानाचा वेग आता आपण वाढवू शकतो परंतु कमी करू शकत नाही , त्यामुळेच आपल्याला अतिशय योजनाबद्ध पद्धतीने प्लुटो चे निरीक्षण  करून , त्याची जमेल तितकी छायाचित्रे ( हाय डेफिनेशन ) मध्ये काढून , सर्व महत्वाची  माहिती  गोळा  करावी लागेल , व हा अमुल्य माहितीचा खजिना पृथ्वीकडे परत पाठवावा लागेल.

  ३) सर्वात महत्वाचे म्हणजे न्यू होरायझन्सने सर्व माहिती + निरीक्षणे + छायाचित्रे घेतल्यावर  देखील जमा केलेली सर्व माहिती पृथ्वीवर परत पाठवली पाहिजे.

४)सूर्याचा प्रकाश प्लुटो वर पोहोचायला तब्बल ४.५ तासांचा कालावधी लागतो ( पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोचायला तब्बल ८ मिनिटे लागतात ) न्यू होरायझन्स पृथ्वीवर प्रकाशाच्या वेगाने संदेश पाठवणार आहे.

५) म्हणजेच न्यू होरायझन्स चा एक संदेश पोहोचायला  साढे चार तास लागतील ( ४.५ तास ) , त्याचप्रमाणे यानाला पृथ्वीवरून संदेश पाठवायला साडे चार तास लागतील . म्हणजेच साधारण न्यू होरायझन्स सोबत १ संभाषण पूर्ण करण्या साठी ९ तास लागणार.

६) केवळ हेच नाही , डाऊनलोडिंग  स्पीड २ केबी/ प्रती सेकंद  (2Kbps )असा असणार आहे जो अतिशय कमी आहे. त्यामुळे न्यू होरायझन्स जरी १४ जुलै २०१५ ला प्लुटो ला भेट देणार आहे तरी देखील त्या भेटी दरम्यान जमा केलेली सर्व माहिती पृथ्वीवर परत यायला तब्बल १ वर्ष लागणार !

७) न्यू होरायझन्स ची अन्टेना हे पृथ्वीकडे रोखलेली नसल्याने माहिती पाठवणे खगोल अभ्यासकांसाठी तारेवरची कसरत असणारे. १४ जुलैला संध्याकाळ पासून डाऊनलोड लिंक उपलब्ध होईल ज्याच्या पासून आपल्याला माहिती उपलब्ध होण्यास सुरवात होईल, व प्लुटो कसा दिसतो या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

८) न्यू होरायझन्स ने २००६ साली आपला प्रवास सुरु केला, त्या सुमारास प्लुटो ला केवळ १ चंद्र आहे अशी सर्व साधारण माहिती उपलब्ध होती, परं २०११ ला हबल अंतराळ दुर्बिणीचा रोख प्लुटो कडे वळावल्यावर त्याला अजून २ चंद्र आहेत असे समजले, तसेच आतागायात २०१५ ला प्लुटो ला एकूण ५ चंद्र आहेत असे आपल्याला माहित आहे. जर न्यू होरायझन्सने आणखीन  काही चंद्र शोधले तर त्या चंद्राच्या कक्षा ठरवून यानाला आपला मार्ग बनवावा लागेल ( लक्ष्यात घ्या पृथ्वीसोबत यानाला  १ संपूर्ण संभाषण पूर्ण व्हायला तब्बल ९ तास लागणार आहेत!!!!)

९) प्लुटो चे पृथ्वीपासून चे अंतर हे ४.७६  बिलिअन किलोमीटर्स   (२.९६ बिलिअन मैल ) इतके आहे म्हणजेच " सुर्य पृथ्वी " या अंतराच्या ३२ पट आहे. हे अंतर पार करायला न्यू होरायझन्स ला ३,४६२ दिवस लागतील ( १९ जानेवारी २००६- १४ जुलै २०१५ )

 १०) २ डिसेंबर २०११ पर्यंत प्लुटो पासून सर्वात  जवळ असलेली मानव निर्मित वस्तू " वोयेजर -१" होती , परंतु आता ती न्यू होरायझन्स यान झाली आहे , त्याचप्रमाणे ते प्लुटो कडे अधिक वेगाने झेपावत आहे .

११)न्यू होरायझन्स  पहिले असे  यान आहे ज्याच्या मध्ये कोलेज च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले धुलीकण गोळा  करणारे " विनिषा " नावाच्या उपकरणाचा समवेश आहे. विनिषा नावाच्या मुलीने सर्वप्रथम " प्लुटो" हे नाव सुचवले होते त्यामुळे तिच्या स्मृतीप्रित्यर्थ उपकरणाला हे नाव ठेवण्यात आले

१२) न्यू होरायझन्स RTG (radioisotope thermal generator) चा वापर करून उर्जा निर्मिती करते, कारण प्लुटो सूर्या पासून अतिदूर असल्याने ( सूर्यप्रकाश पोहोचायला ४.५ तास लागतात )  सौर उर्जेवर हे यान इतक्या दूरवर चालू शकत नाही.

१३) १४ जुलै २०१५ ला प्लुटो च्या भेटी दरम्यान न्यू होरायझन्स हे प्लुटो च्या जमिनी पासून केवळ ९,६५० किलोमीटर लांब असेल ! म्हणजेच आपल्याला प्लुटो चं जमिनी पासून ९,६५० लांब अंतरावून प्लुटो कसा दिसतो हे देखील छायाचित्राद्वारे दिसू शकेल !    

 १४)प्लुटो चा वेध घेतल्या नंतर न्यू होरायझन्स बाह्य सूर्यमाला मध्ये त्याचे मार्ग तयार करण्यासाठी तो यानाला अतिरिक्त गती चालना देण्यासाठी प्लूटोचे गुरुत्वाकर्षण वापरेल, व २०२० पर्यंत प्रवास कारण राहील, 2026 ला अधिकृतरीत्या हे मिशन संपेल.




प्लुटो व त्याचे चंद्र ! 


प्लुटो व शरोन चे रंगीत छायाचित्र 

Thursday, April 16, 2015

पासपोर्ट टू प्लुटो !


आपल्या सौरमालेतील अनेक ग्रहांबद्दल अनेक लेख लिहिले जातात , परंतु एके काळी ग्रह असलेला प्लुटो बद्दल मात्र उलट आहे ! खरेतर प्लुटो बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे , इतकेच नव्हे तर १९३० मध्ये शोध लागल्या पासून आजतागायत आपल्या हे माहीत नाही की प्लुटो कसा दिसतो, अतिशय इंटरेस्टिंग असलेला विषय अखेरीस माझ्या नजरेत आला व माझे संशोधन सुरु झाले " पासपोर्ट टू प्लुटो ! "
                            

वास्तविक नेपच्युन पलीकडे एखादा विशाल ग्रह असावा अशी भाकिते अनेक वर्षापासून करण्यात येत होती , त्यातच काही हौशी मंडळी या नवीन ग्रहाच्या शोधासाठी जोमाने लागली. १९०६ मध्ये पर्सिव्हाल लॉवेल या व्यक्तीने अ‍ॅरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन केली व येथे या नवीन ग्रहाच्या शोधासाठी , किंबहुना त्याचे पहिले छायाचित्र हस्तगत करण्यासाठी प्रकल्प सुरु केला. परंतु १९१६ नंतर जवळपास १० वर्षे हा प्रकल्प असाच थांबला. १९२९ मध्ये वेधशाळेचे त्यावेळेचे संचालक व्हेस्टो मेलव्हिन स्लिफर यांनी या नवीन ग्रहाला शोधण्याची जबाबदारी  क्लाईड टॉमबॉघकडे सुपूर्द केली. टॉमबॉघचे यांचे काम होते, दोन आठवड्यांच्या अंतराने काढल्या गेलेल्या दोन छायाचित्रांचे निरीक्षण करणे व त्यामध्ये कोणत्या वस्तूने जागा बदलली आहे का ते पाहणे.
                                     
क्लाईड टॉमबॉघ "ब्लिंक सेपरेटर" नावाचे यंत्र वापरून नवीन ग्रहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते , ब्लिंक सेपरेटर हे यंत्र  आकाशातील एका ठराविक पट्याचा फोटो काढून त्याच पट्याचा  काही कालावधी नंतर फोटो काढून नंतर ते मागेपुढे हलवून ( काही जागा बदल्या आहे का ) हे तपासण्यास सक्षम होते.या छायाचित्रात  अतिदूर असलेले तारे आपली जागा बदलत नसत, परंतु एखादी गोष्ट जर आपल्या सूर्यमालेत असेल तर ती यात जागा बदलत असे. अश्याप्रकारे जवळपास एका वर्षाच्या अथक शोधानंतर फेब्रुवारी १८, १९३० रोजी टॉमबॉघला जानेवारी २३ व जानेवारी २९ च्या चित्रांमध्ये संभाव्य हाललेली वस्तू सापडली. व प्लुटो ग्रहाचा शोध लागला ! वास्तविक प्लुटो अतिदूर असल्याने वरील छायाचित्रात तो केवळ एका "बिंदू" सारखाच दिसतो!नवीन ग्रहाचा शोध लागल्या नंतर सर्वत्र एकाच खळबळ माजली, अनेक वृत्तपत्रांनी तर याला "शतकातील सर्वोत्तम वैज्ञानिक  शोध" असे वर्णन केले. प्लूटो हे नाव प्रथम "व्हेनेशिया बर्ने " या त्यावेळी ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड येथील शाळकरी मुलीने सुचविले.
                                

प्लुटो हा ग्रह आधी पृथ्वीपेक्षा मोठा आहे असे मानण्यात येत होते, परंतु काही कालावधीनंतर तो आपल्या पृथ्वी एवढाच आहे असे मानण्यात आले , परंतु जशी जशी निरीक्षणे अचूक होत गेली तेव्हा आपल्याला त्याच्या अस्सल आकारमानाचा पत्ता  लागला , तेव्हा समजले कि तो आपल्या चंद्रापेक्षा देखील छोटा आहे. काही कालावधीसाठी असा विनोद बनलेला की प्लुटो जर असेच छोटा होत गेला तर तो २१ व्या शतकापर्यंत गायब होणार ! परंतु आता  २ गोष्टी या निश्चित होत्या की प्लुटो हा आकाराने खूप लहान आहे व तो पृथ्वीपासून अतिदूर आहे. प्लुटो हा "सुर्य-पृथ्वी" अंतराच्या ३० पट लांब आहे म्हणजे आपल्याला त्याच्या अंतराची  कल्पना आली असेल ( पृथ्वी पासून ७.५ बिलियन किलोमीटर/ ४.६७  बिलियन मैल ).  पृथ्वीपासून इतक्या लांब असल्याने आजपर्यंत आपल्याला तो कसा दिसतो हे माहित नाही , इंटरनेट वर प्लुटो चे अनेक फोटो उपलब्ध आहेत पण ते खोटे आहेत. आपण अजून पर्यंत फक्त कल्पनाच करू शकतो की प्लुटो ग्रह कसा असेल, पण याचा अर्थ असा नाही की मानवाने प्लुटो चा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला नाही!
                                

७० च्या दशकात क्लाईड टॉमबॉघ यांची वापरलेली पद्धत कायम ठेवत खगोल अभ्यासक जेम्स ख्रिस्ती व बॉब यांनी महिन्याभराच्या अंतराने प्लुटो चे २ छायाचित्र घेतले  या छायाचित्रात प्लुटो चा उपग्रह पहिल्यांदा दिसून आला , क्लाईड टॉमबॉघ यांनी प्लुटो च्या घेतलेल्या एका बिंदू च्या फोटो नंतर हा दुसराच प्रयत्न होता. त्या नंतर पृथ्वीवरील वेधशाळेतून  जमिनीवरून प्लुटो चे त्यावेळेचे सर्वात उत्तम छायाचित्र घेतले गेले, परंतु ते देखील स्पष्ट नव्हते तरीपण या छायाचित्रात प्लुटो व त्याचा उपग्रह शरोन स्पष्ट दिसत होता.
                                

 काही कालावधी नंतर हबल या अंतराळ दुर्बिणीची स्थापना नासा ने केली, पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालत ही  दुर्बीण अंतराळाचे फोटो घेत असत, त्यामुळे या सुवर्ण संधीचा खगोलशास्त्राज्ञानी लाभ उचलला, व हबल चा रोख प्लुटो कडे केला, तिने आपल्याला प्लुटो व त्याच्या उपग्रहाचे आजपर्यंत चे उत्तम छायाचित्र दिले तसेच त्यांच्या दोघांचे अंतर मोजण्यास देखील मदत झाली, परंतु प्लुटो हा पृथ्वी पासून अतिदूर असल्याने व आकाराने खूप लहान असल्याने आपण ८० च्या दशकापर्यंत देखील त्याचे खरे स्वरूप पाहू शकत नव्हतो

                                     
                                       

 अखेर ९० च्या दशकात हबल दुर्बिणी मधील आरसे दुरुस्त केल्यावर हबलने आपल्याला १ black&white फोटो दिला जो आजपर्यंत चा सर्वात उत्तम व हबल ने एवढ्या जवळून काढलेला अखेरचा फोटो ठरला, परंतु हा फोटो अतिशय धुसर  होता ,या black&white फोटोला true color मध्ये रुपांतर करायला नासाच्या खगोल अभ्यासकांना १ दशकापेक्षा जास्त वेळ लागला व आपल्याला कॉम्पुटर ने बनवलेले प्लुटो चे अंतिम छायाचित्र मिळाले. प्लुटो हुबेहूब असा दिसत नाही परंतु त्याचा भूभाग असा असावा असे आपण गृहीत धरू शकतो! खरेच १९३० मध्ये एका छोट्याश्या बिंदू पासून सुरवात झालेला  प्लुटो चा प्रवास आपण त्याच्या truecolour फोटो पर्यंत येउन पोहोचवला.

                               
                                    

                           

प्लुटो सूर्याभोवती २४८ वर्षात एक फेरी पूर्ण करतो म्हणजे त्याचा एक ध्रुव हा १२० वर्ष कायम अंधारात असतो वर एक ध्रुव १२० वर्ष कायम उजेडात असतो. याच कालावधीत प्लुटो च्या आसपास ( मागे- पुढे) लघुग्रहांच्या पट्ट्या सारख्या अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला "जेरार्ड कायपर " यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले.
                              
  २००६ पर्यंत प्लुटो ला ग्रहाच मानण्यात आलेले. परंतु याच सुमारास मायकल ब्राउन यांना प्लुटोपेक्षा २५% मोठा असलेला अजून एक ग्रह सापडला ज्याला एरिस असे नाव दिले गेले. परंतु एरिस च्या शोध नंतर मात्र प्लुटो पुढील "ग्रह" हे विशेषण जाणार होते ! वास्तविक प्लुटो ची कक्षा इतर ग्रहांच्या तुलनेत जर अजब आहे. प्लूटोची कक्षा लंबवर्तुळाकार असून ती या प्रमाण प्रतलापासून १७° पेक्षा जास्त कललेली आहे. त्याचप्रमणे प्लुटो हा नेपच्यून च्या कक्षेला छेदत जातो. एरिस ची कशा देखील अशीच थोडी विचित्र आहे. अखेर २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने ग्रहाची औपचारिक व्याख्या केली. त्यानुसार जर एखादी खगोलीय वस्तू खालील तीन अटी पूर्ण करत असेल तर त्याला ग्रह मानण्यात यावे.
१. ती खगोलीय वस्तू सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असावी.
२. त्या खगोलीय वस्तूचे वस्तुमान कमीत कमी इतके असावे की ज्यायोगे तिचा आकार गुरुत्वाकर्षणामुळे गोलाकार व्हावा.
३. त्या खगोलीय वस्तूने आपली कक्षेजवळील भाग साफ केलेला असावा. याचा अर्थ असा की तिच्या कक्षेजवळील अंतराळातील लहान वस्तू तिच्या गुरुत्वाकर्षणाने तिच्यामध्ये विलीन झाल्या असाव्यात.
वर सांगितल्याप्रमाणे प्लुटो हा नेपच्युन च्या कक्षेला छेदत जात असल्याने प्लूटो तिसरी अट पूर्ण करत नाही, त्यामुळे त्याला आज ग्रह मानण्यात येत नाही व तो आज बटू ग्रहांच्या यादीत आहे.


प्लुटो हा पृथ्वी पासून जेव्हा जवळ असतो तेव्हा खूप जवळ असतो व जेव्हा लांब असतो तेव्हा प्रचंड लांब, प्लुटो ने सध्या नुकतीच नेपच्यून ची कक्षा ओलांडली  आहे त्यामुळे तो आता सूर्यापासून अतिदूर जाणार, म्हणजे आपण जर प्लुटो वर यान पाठवायचा प्रयत्न उशिरा केला तर आपल्याला अजून २४८ वर्षे थांबावे लागेल म्हणून नासा ने "न्यू होरायझन्स"  या यानाला प्लुटो वर पाठवायचा निर्णय घेतला आहे, वास्तविक १९९० च्या  दशकात " कायपर एक्सप्रेस  " हे यान प्लुटो कडे पाठवायचे ठरवले होते परंतु अमेरिका सरकारने या यानाला निधी मंजूर केला नाही व हा प्रकल्प रखडला , त्याच्या आधी  म्हणजे १९७० च्या दशकात वोयेजेर -१ हे यान प्लुटो जवळून जाणार होते परंतु अचानक त्याची कक्षा बदलून ते शनि ग्रहाचा उपग्रह  टायटन कडे वळवण्यात आले , सोबतची वोयेजेर - २ तसेच पायोनियर - १० इत्यादी याने प्लुटो पासून प्रचंड लांब होती त्यामुळे १९३० मध्ये शोध लागून सुद्धा आपण एकपण यान प्लुटो जवळ  किवा खास प्लुटो चा अभ्यास करण्यासाठी पाठवले नाही त्यामुळे आज २०१५ ला सुद्धा प्लुटो ग्रह एक कोडेच बनला आहे! २००६ साली न्यू होरायझन्स हे यान प्लुटो कडे झेपावले. न्यू होरायझन्स हे आजपर्यंत चे सर्वात जलद असे यान आहे , त्याने  चंद्राची कक्षा  केवळ ९ तासात ओलांडली ( ज्या साठी अपोलो ला ३ दिवस लागलेले ) एवढे जलद यान असून सुद्धा ते २०१५ ला प्लुटो जवळ पोचेल ( म्हणजे अजून ३ महिन्यांनी ) ते इतक्या वेगाने धावत आहे की हलक्याश्या दगडाने देखील यान नष्ट होऊ शकते. त्याचप्रमाणे त्याचे आवरण खास करून तयार केले आहे , या आवरणाच्या आत सर्व यंत्रे/ कॅमेरा ठेवला आहे. आवरणा बाहेरील तापमान  -२०० फ़ेरेनहाईट पर्यंत  जाऊ शकते परंतु आवरणा आतील वस्तूंचे तापमान मात्र २२ सेलसीअस आहे ( म्हणजे रूम टेम्परेचर)    



 न्यू होरायझन्स यान पाठवण्यापूर्वी खगोल अभ्यासकांनी पुन्हा एकदा हबल ची मदत घेतली व या वेळी प्लुटो चे १ नवीन रूप समोर आले!! आजपर्यंत आपल्याला माहित होते की प्लुटो ला १ उपग्रह आहे , परंतु आता ४ अजून नवीन उपग्रहांचा शोध लागलेला. प्लुटो जवळ जाणारे पहिलेच यान असल्याने या यांना पासून अपेक्षा खूप आहेत याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात "क्लाईड टॉमबॉघ" यांच्या अस्थि देखील जोडल्या आहेत म्हणजे क्लाईड टॉमबॉघ यांना त्यांचा लाडका ग्रह पहावयास मिळावा म्हणून! प्लुटो पर्यंत चा प्रवास अतिशय खडतर आहे, आपल्याला प्लुटो ची पहिली अस्सल झाला १४ जुलै २०१५ ला पहावयास मिळेल , यान १४ जुलै ला प्लुटो चे छायाचित्र काढेल व पृथ्वीकडे पाठवेल . मगाशी सांगितल्या प्रमाणे प्लुटो पृथ्वीपासून अतिदूर असल्याने यांचे संदेश पृथ्वीवर पोचायला ४.५ तासांचा  अवधी लागेल , डाऊनलोड  स्पीड रेट असेल २ केबी प्रती सेकंद ( 2kb/ps). १५ जुलै ला सकाळपासून डाऊनलोडिंग    चालू होईल व आपल्याला प्लुटो चा पहिला वाहिला फोटो पहावयास मिळेल जो कायम सर्वांच्या स्मरणात राहील ! म्हणून आता १४ जुलै २०१५ चा इंतजार... !!!
                         

Saturday, February 14, 2015

"सुपर हीट" आत्मचरित्र !



 खूप दिवसांपूर्वी यु ट्यूब वर मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या अभिनय कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्या बद्दलचा सोहळा बघितला. नुसते मराठीतीलच नव्हे तर हिंदी मधील अनेक दिग्गज सोहळ्याला उपस्थित होते. याच कार्यक्रमा दरम्यान सचिन पिळगावकर यांनी आपले आत्मचरित्र " हाच माझा मार्ग " दस्तुरखुद्द "सचिन तेंडूलकर" याच्या हस्ते प्रकाशित केले. मराठीतील एवढ्या दिग्गज अभिनेत्याचे आत्मचरित्र वाचण्याचा योग मला नुकताच आला. सचिन यांचा पहिला चित्रपट "हा माझा मार्ग एकला " यावरूनच त्यांनी या आत्मचरित्राचे नाव "हाच माझा मार्ग" ठेवले आहे. पुस्तकाच्या सुरवातीलाच सचिन सांगू इच्छितात, की हे पुस्तक त्यांना कोणाला अर्पण करायचे आहे ते climax लाच कळेल. त्यामुळे पहिल्या प्रकरणा पासून ते शेवटच्या प्रकरण पर्यंत वाचकाची उत्सुकता वाढत जाते.


                                               

वयाच्या सुरवातीला आलेला अभिनयाचा प्रसंग , स्वतः लहान वयात दिग्दर्शित केलेला स्वतः चा पहिलावहिला फोटो , अभिनयाची सुरवात असे विविध पैलू उलगडत जातात. मनात कायम असलेली "दिग्दर्शक" बनायची स्वप्ने याच दरम्यान सुरु होतात. मास्टर सचिन ते अभिनेता सचिन असा प्रवासाला प्रारंभ होतो. अगदी लहान वयात मराठीमधील दिग्गज अभिनेते तसेच हिंदीमधील देव आनद संजीव कुमार यांच्या सारख्या दिग्गजांसोबत अभिनयाची संधी मिळाल्यावर मनाची स्थिती कशी होते याबद्दल चे वर्णन ऐकून खूप उत्सुकता वाढत जाते. लहान वयात हिंदीत काम मिळू लागल्यावर त्या वेळेसचे मित्र, बालकलाकार, इत्यादींचा उल्लेख सचिन आवर्जून करतात.पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार, पंडित नेहरूंनी स्वतः  मांडीवर बसवून केलेले कौतुक व बक्षीस म्हणून स्वतःच्या कोट वर लावलेले त्यांचे आवडते गुलाब भेट दिलेला प्रसंग, मीना कुमारीमुळे उर्दू ची लागलेली गोडी, आचार्य अत्रे  सोबतचा सहवास, रंगभूमी वरील कारकीर्द,  एवढेच नव्हे तर अगदी लहान वयात उर्दूवर मिळवलेले अफलातून प्रभुत्व यामुळे चक्क कादर खान यांनी केलेली प्रशंसा अश्या गोष्टी वाचून आश्चर्य वाटते.

            


मास्टर सचिन चा आता हळू हळू अभिनेता सचिन व्हायला सुरवात होते, राजश्री कडून तशी ऑफर येते , चित्रपट सुपर हीट  होतो.  तसेच सचिन यांनी "शोले" सारख्या चित्रपट बद्दल आवर्जून लेखन केले आहे, तसेच "शोले" मधला ट्रेन चा प्रसंग सचिन यांच्या युनिटच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शित झाला आहे या गोष्टी अगदी पहिल्यांदा कळतात. अभिनेता म्हणून कमावलेले नाव , दिग्दर्शनाची चाहूल, मराठी मध्ये पदार्पण अश्या अनेक गोष्टी या दरम्यान घडतात, संजीव कुमारच्या आकस्मिक जाण्याने त्यांना धक्का बसतो. हिंदी मध्ये जम बसल्या नंतर मराठीमध्ये सुद्धा सचिन यांचा खेळ सुरु असतो, याच दरम्यान ज्येठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सोबत सुरु केली फिल्मी कारकीर्द, "अशी ही बनवा बनवी" ची संपूर्ण कथा , या मराठी चित्रपटाचा २५ आठवडे चालल्याचा सोहळा, दिलीप कुमार यांची उपस्थिती, पुढे अनेक सुपर हीट चित्रपटांची रांग, इत्यादी गोष्टी यात नमूद केल्या आहेत. याच दरम्यान राजेश खन्ना, शमी कपूर यांसारख्या " खवय्या" लोकां सोबत केलेली मेजवानीचे देखील किस्से आहेत. राजेश खन्ना सोबत "अवतार" या चित्रपट केलेल्या भूमीकेबद्दल सचिन खुलून लिहितात. राजेश खन्ना नाव आले म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचे देखील अनेक किस्से आहेत, सचिन एकदा रागावलेले असताना अमिताब बच्चन यांनी स्वतः काढलेला सचिन यांचा फोटो देखील त्यांनी दिला आहे. सत्ते पे सत्ता यात सचिन अभिताभच्या सर्वात लाडक्या भावाची भूमिका करत होते , खऱ्या आयुष्यात पण याची पुनरावृत्ती होते

                        

                         
१९९५ नंतर हळू हळू सचिन आपला रोख मोठ्या पडद्या वरून छोट्या पडद्या कडे वळवतात, "तू तू मै मै" सुपर हीट होते, त्या जमान्यात स्टार प्लस ही इंग्रजी वाहिनी होती त्यावर फक्त " तू तू मै मै" हीच हिंदी मालिका दाखवली जायची याबद्दल सचिन आजदेखील आठवण काढतात. छोट्या पडद्या वर एक यशस्वी दिग्दर्शक बनल्यावर सचिन मराठीत पुरागमन करतात. एका वाहिनी सोबत वाईट वर्तणूक दिल्यामुळे  "माझा चित्रपट टी वी वर प्रसारित करण्याचे हक्क  तुम्हाला ३० लाखांना विकेन ते पण फक्त ५ वर्षासाठी "  असा निश्चय करून चित्रपटनिर्मिती साठी पुन्हा सुरवात करतात, चित्रपट ठरतो " नवरा माझा नवसाचा". कोल्हापूर पुणे येथे चित्रपट सुपर हीट होतो व मुंबई तो चित्रपटगृहात लावण्या साठी वितरकांची गर्दी होते, व सचिन नंतर या चित्रपटाचे  टी वी वर प्रसारित करण्याचे हक्क खरेच "३० लाखांना व फक्त ५ वर्षासाठी त्याच वाहिनीला विकतात". त्या नंतरच्या प्रकरणात १ नाट्यमय मोड येतो " नच बलिये " च्या रूपाने. या वयात देखील स्वतःपेक्षा तरुण असेलेल्या जोड्यांना हरवून ते या पहिल्या पर्वाचे विजेते बनतात, नुसत्या महाराष्ट्रातून नाही तर अख्या देशभरातून त्यांना ७० % पेक्षा अभिक मते मिळतात, याच नच बलिये दरम्यानचे किस्से सचिन यांनी खूप चांगले रंगवले आहे.

                              

                            


नंतर त्यांनी मराठी मध्ये नृत्य संदर्भात " एका पेक्षा एक" कार्यक्रम सुरु केला, यात "महागुरू" ही  संकल्पना आपली नाही लेखकाची आहे हे ते प्रांजळपणे कबूल करतात. वेळप्रसंगी गुणी कलावंताना स्वतः मार्गदर्शन केले. मित्र जुनिअर मेहमूद साठी देखील मैत्री खातर एका चित्रपटात विनामूल्य काम केले . त्या नंतर आलेले चित्रपट, आयुष्यातले बाकी किस्से याने लिखाण सुरु राहते. अनेक कलावंताना त्यांनी पहिली संधी दिली मग ती अभिनयाची असो किवा इतर. त्यांनी संधी दिलेल्या लोकांमध्ये आज अनेक सुप्रसिद्ध लोकांचा समावेश आहे.

                                                            

यातच सचिन आपल्या परिवाराबद्दल विस्ताराने लिहितात, सुप्रिया यांच्याशी झालेली ओळख, लग्न, मुली बद्दल असलेली काळजी , जीवापाड प्रेम या सर्व गोष्टी वाचून मन थक्क होते! "क्युंकी सास भी कभी बहु थी"  या मालिकेचे टायटल सचिन पिळगावकर यांच्या नावावर रजिस्टर होते, जितेंद्र यांच्या मैत्री साठी त्यांनी ते विनामूल्य दिले कोणतीही अट न घालता, असेच "यमला पगला दिवाना" या टायटल चे हक्क देखील  सचिन पिळगावकर यांच्या नावावर रजिस्टर होते ते देखील त्यांनी धर्मेंद्र यांना दिले.

                                 


एकूणच इतके प्रामाणिक आत्मचरित्र माझ्या वाचण्यात तरी अजून आले नाही. सचिन प्रत्येक प्रकरणात विस्ताराने आणि खऱ्या मनाने बोलतात. त्यांचे आत्मचरित्र आवर्जून  वाचण्या सारखे झाले आहे. आपल्याला कोणत्याच प्रकरणात कंटाळा येत नाही किवा अतिशयोक्ती वाटत नाही. त्यांचे हे आत्मचरित्र त्यांच्या चित्रपटा  प्रमाणेच सुपर हीट आहे!